आंदोलक शेतकऱ्यांना दिलजीतने केली एवढ्या कोटींची मदत


शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज सिंधू बॉर्डरवर पोहचला. त्यानंतर दिलजीतने थंडीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक कोटी रुपयांची रक्कम दान केली आहे. दिलजीतने एक कोटी रुपयांची रक्कम आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना थंडीपासून आराम मिळण्यासाठी स्वेटर किंवा चादर खरेदी करण्यासाठी दिली आहे. पंजाबी गायक सिंघा यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर सिंघा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत दिलजीतने एक कोटी रुपये दान केल्याची माहिती दिली. तसेच आंदोलनाला पांठिबा दिल्याबद्दलही दिलजीतचे आभारही व्यक्त केले आहेत.

शेतकरी आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी शनिवारी पोहचलेला दिलजीत म्हणाला की, प्लीज, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या एवढीच आमची विनंती आहे. शेतकरी शांततेत येथे आंदोलन करत आहे. संपूर्ण देश शेतकऱ्यांसोबत आहे. तुम्ही कडाक्याच्या थंडीमध्येही आंदोलन करत आहात. माझा सर्व शेतकऱ्यांना सलाम आहे. शेतकऱ्यांनी नवीन इतिहास लिहिला आहे. हा इतिहास येणाऱ्या पिढीला सांगितला जाईल. शेतकऱ्यांच्या अडचणी कोणीही वाढवू शकत नसल्याचेही दिलजीत म्हणाला.

दरम्यान, शेतकरी आंदोलनावरुन नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि दिलजीत दोसांज या दोघांमध्ये ट्विटर वॉर झाले होते. कंगनाने आंदोलनकर्त्या एका वृद्ध महिलेविषयी आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यावर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला होता.