सोशल मीडियात मुंबईच्या प्रभादेवीतील रक्तदानाच्या बदल्यात चिकन आणि पनीरची चर्चा


मुंबई – राजकीय नेते मंडळींकडून राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजित करण्यात येत असून नागरिकांना निरनिराळ्या भेटवस्तू देऊन रक्तदानासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न नेते मंडळींनी चालविले आहेत. तर मुंबईतील प्रभादेवीमध्ये रक्तदान करणाऱ्या मांसाहारींना एक किलो कोंबडी, तर शाकाहारी व्यक्तींना पनीर देण्यात येणार असून सध्या सोशल मीडियात प्रभादेवीतील सध्या कोंबडीचे मांस आणि पनीरची जोरदार चर्चा सुरू आहे.

राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिक कोरोनाच्या संसर्गामुळे रक्तदान करण्यास तयार होत नसल्याचे चित्र दिसत आहे. तसेच कोरोना चाचणी रक्तदानापूर्वी करण्यात येत असून त्यात बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यास विलगीकरणात जावे लागेल अशी भीतीही नागरिकांच्या मनात घर करुन बसल्यामुळे बहुसंख्य मंडळी रक्तदान करण्यास तयार होत नाहीत.

नागरिकांच्या मनातील भीती ओळखून रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या मंडळींनी रक्तदान करणाऱ्यास भेटवस्तू देण्याचे आमीष दाखविण्यास सुरुवात केली आहे. रक्तदाते भेटवस्तूच्या निमित्ताने मिळतील, असे आयोजकांना वाटत आहे. माहीम-वरळी विधानसभा क्षेत्रात १३ डिसेंबर रोजी शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. न्यू प्रभादेवी रोडवरील राजाभाऊ साळवी मैदानात हे रक्तदान शिबीर पार पडणार आहे.

नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे, मांसाहारी रक्तदात्याला यासाठी एक किलो कोंबडी, तर शाकाहारी रक्तदात्याला पनीर देण्यात येणार असल्याचे फलक प्रभादेवी परिसरात झळकविण्यात आले आहेत. रक्तदान करण्यासाठी या शिबिरात नागरिकांना प्रभादेवी येथील शिवसेना शाखा क्रमांक १९४ मध्ये ११ डिसेंबरपूर्वी नाव नोंदणी करावी लागणार आहे. प्रभादेवीमध्ये सध्या महा रक्तदान शिबिराच्या निमित्ताने चिकन आणि पनीर हा चर्चेचा विषय बनला आहे.