३६ ब्रिटिश खासदारांचा भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा


लंडन – ब्रिटनमधील ३६ खासदारांनी भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असून ३६ ब्रिटिश खासदारांनी तिथल्या लेबर पार्टीचे खासदार तनमनजीत सिंग धेसी यांच्या नेतृत्वाखाली युकेचे सचिव डोमिनिक राब यांना याबाबत पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्राद्वारे कृषी विधेयकाविरोधात भारतावर दबाव टाकण्याची मागणी केली आहे. रॉब यांना खासदारांच्या गटाने म्हटले की, पंजाबच्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि युकेच्या कार्यालयांमार्फत भारत सरकारशी चर्चा करावी.

तनमनजीत सिंग म्हणाले, अनेक खासदारांनी गेल्या महिन्यात आपल्याला तसेच लंडनमधील भारतीय उच्चायोगाला भारतातील शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या तीन कृषी कायद्यांबाबत लिहिले होते. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने आणलेले ही तीन कृषि विधेयके शेतकऱ्यांचे शोषण थांबवणे आणि त्यांच्या पीकांना योग्य मोबदला देण्यास अपयशी ठरल्याबद्दल देशभरात व्यापक स्वरुपात शेतकरी निषेध आंदोलन करत आहेत.

ब्रिटनमधील शीख आणि पंजाबशी निगडीत असलेल्या लोकांसाठी हा विषय विशेष चिंतेचा असून भारतातील हा कायदा इतर राज्यांसाठीही अडचणीचा ठरत आहे. या प्रकरणी अनेक ब्रिटिश शीख आणि पंजाबी लोकांनी आपल्या खासदारांसोबत आवाज उठवला आहे. कारण पंजाबमधील त्यांच्या कुटुंबीयांना याची झळ बसणार आहे.