पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी


मुंबई : महाविकास आघाडीने विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर सरशी केली असून मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे तर पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी अद्याप सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय निश्चित झाला आहे.

दरम्यान काँग्रेसने नागपूर पदवीधर विधानपरीषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी झाल्याचा दावा केला आहे. तर पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद फेरीपर्यंत पोहोचली असून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष सरनाईक आघाडीवर आहेत.

मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. सलग तिसऱ्या विजयाची चव्हाण यांनी हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढल्याचे मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण व्यक्त केले. सतीश चव्हाण यांनी पहिल्या फेरी पासून घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली. एकूण 1,16,638 मते सतीश चव्हाण यांना मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना 58,743 मते मिळाली. पाचव्या फेरी अखेर सतीश चव्हाण यांना 57,895 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.

पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी मिळवली आहेत. मतमोजणी अद्याप सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय निश्चित झाल्यामुळे अरुण लाड हे सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी जाणार आहेत. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची 73,321 मते, 48 हजार 824 मतांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांचा पहिल्या फेरीतच दणदणीत विजय मिळवला आहे.

बाद फेरीपर्यंत पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही पोहोचली असून यात काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत. जयंत आंसगावकर यांना विसाव्या बाद फेरी अखेर 17 हजार 117 एवढी मते मिळालेली आहेत तर अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना 11 हजार 161 एवढी मते मिळाली आहेत. भाजपचे उमेदवार जितेंद्र पवार येथे तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. त्यांना पाच हजार 878 एवढी मते मिळालेली आहेत. मतमोजणी अद्याप सुरू आहे.

अपक्ष उमेदवार अॅड किरण सरनाईक 6 हजार 390 मत घेत अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात आघाडीवर आहेत. 5 हजार 383 मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे द्वितीय क्रमांकावर तर शिक्षक महासंघाचे उमेदवार शेखर भोयर 5150 मतांनी तृतीय क्रमांकावर आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरु आहे.