मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या बेस्टच्या २६ अत्याधुनिक एसी इलेक्ट्रीक बसेस


मुंबई – टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या असून या बसेसेमुळे मुंबई शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यात येईल. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या बस ताफ्याचे लोकार्पण करण्यात आले.

इलेक्ट्रीक बस योजना केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या ‘फेम II’ उपक्रमांतर्गत (फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रीक वेहिकल्स) राबविली जात आहे. ‘फेम’कडून या योजनेअंतर्गत ३४० बस गाड्या मंजूर झाल्या आहेत. यापैकी 26 बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात आज दाखल झाल्या आहेत. त्या प्रवाशांसाठी आजपासून सुरु करण्यात आल्या आहेत.

यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईकरांच्या सेवेत आजपासून या इलेक्ट्रीक बस सुरु झाल्या ही आनंदाची बाब आहे. मुंबईत सद्यस्थितीला 46 बसेस सुरु असून अजून एकूण ३४० बसेस उपलब्ध होणार आहेत. येणाऱ्या काळात उर्वरित बसगाड्यांपैकी जास्तीत जास्त संख्येत बसेस उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा केला जाईल. अशा इलेक्ट्रीक बसगाड्यांसारखे उपक्रम शाश्वत आणि वातावरणातील बदलासाठी राबविले पाहिजेत. तसेच मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर राहील याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी या लोकार्पण सोहळ्यावेळी बसची पाहणी केली. जनतेसाठी एसी बस सोयीची आणि सुखकारक ठरेल याची खात्री करण्यासाठी स्वत: या नवीन इलेक्ट्रीक बसने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

सुरक्षेची काळजी या बसेसमध्ये घेण्यात आली असून अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात आले आहे. या कॅमेऱ्याद्वारे बसेसमध्ये होणाऱ्या अनुचित घटनांवर देखरेख ठेवली जाणार आहे. विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाचे ठरणार आहेत. त्याचबरोबर अपंग प्रवाशांना चढण्या-उतरण्यात समस्या येऊ नये यादृष्टीने बस गाड्यांमध्ये इलेक्ट्रीक लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अपंग प्रवाशांसाठी ही सुविधा सोयीची ठरणार आहे.