ओबामा, क्लिंटन, बुश घेणार करोना लस

फोटो साभार दैनिक भास्कर

ब्रिटन पाठोपाठ अमेरिकेत सुद्धा या आठवड्यात करोना लसीकरणास एफडीएची मंजुरी मिळेल अशी शक्यता आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या मनात असलेल्या शंका आणि भीती दूर व्हावी यासाठी अमेरिकेचे तीन माजी अध्यक्ष कोविड १९ लस टोचून घेणार असून त्याचे टीव्हीवर लाईव प्रक्षेपण केले जाणार आहे. बराक ओबामा, बिल क्लिंटन आणि जॉर्ज बुश ज्युनिअर हे माजी अध्यक्ष करोना लस घेऊन लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरीस यांनीही करोना लस घेणार असल्याची घोषणा केली असून हे सर्वजण लसीला एफडीआय कडून मान्यता मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत. माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी मात्र लस घेण्याबाबत काहीही सांगितलेले नाही.

द गार्डियनच्या रिपोर्ट नुसार सीएनएन वरील एका कार्यक्रमात ओबामा, क्लिंटन आणि बुश उपस्थित होते व त्याच कार्यक्रमात जो बायडेन आणि कमला हॅरीस सुद्धा होते. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बायडेन म्हणाले, अमेरिकेतील प्रत्येक राज्याला लस त्यांना प्रथम मिळावी असे वाटते आहे. आमच्या माजी अध्यक्षांनी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायचे, मागे हटायचे नाही याचा दाखला घालून दिला आहे आणि मीही ते शिकलो आहे. त्यामुळे हे सर्व जण लस घेणार आहेत आणि त्याचे लाईव प्रक्षेपण केले जाणार आहे.

अमेरिकेतील ४० टक्के नागरिकांनी करोना लसीबाबत शंका उपस्थित केल्या असून त्यांच्या मनात लसीची भीती आहे असे सर्व्हेक्षणात दिसून आले आहे. नागरिकांच्या मनात लसीचे दुष्परिणाम किती तीव्र होतील याबाबत शंका आहे.