सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य


मुंबई – शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असे वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. पण त्यानंतर ते वक्तव्य राजकीय नसून पुस्तकातील संर्दभाशी निगडीत असल्याचे शेलार यांनी म्हटले होते. पण आता सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज्यातील राजकारणात सुप्रिया सुळे यांना रस नसून केंद्रातील राजकारणात त्यांना रस असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमत्रीपदाबाबतची चर्चा शरद पवार यांनी फेटाळून लावली. राज्यातील राजकारणात सुप्रिया सुळे यांना रस नसून राष्ट्रीय राजकारणात त्यांना रस आहे. देशपातळीवर अनेक पुरस्कार सुप्रिया सुळे यांना प्राप्त झाले आहेत. देशपातळीवरच काम करण्याची त्यांना आवड आहे. प्रत्येकाची एक आवड असते. त्यांची आवड देशपातळीवरील कामात असल्याचे शरद पवार म्हणाले होते. त्यांनी या विषयावर दैनिक लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत भाष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वांचा संच मोठा असून या सर्वांतून मान्य असतील अशा अनेक लोकांची नावे घेता येतील. अजित पवार आहेत, जयंत पाटील, धनंजय मुंडे अशी अनेक नावे देता येतील, जी नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचेही ते नेतृत्वाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.