लव्ह जिहाद कायद्यांतर्गत उत्तर प्रदेशमध्ये झाली पहिली अटक: हिंदू मुलीसोबत पळाला होता मुस्लिम तरुण


लखनऊ – उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद विरोधात नवीन अध्यादेश लागू करण्यात आला असून बरेलीमध्ये या अध्यादेशातंर्गत तीन दिवसांपूर्वी पहिला एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोपी ओवैस अहमदला (२१) या प्रकरणात बुधवारी अटक करण्यात आली. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी हिंदू मुलीवर जबरदस्ती केल्याचा तसेच धर्मांतरावर मुलीच्या पालकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांना धमकावल्याचा आरोप ओवैस अहमदवर आहे.

मागील काही दिवसांपासून आरोपी ओवैस अहमद फरार होता. त्याच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलीस २८ नोव्हेंबरपासून त्याच्या मागावर होते. त्याच्याविरोधात आयपीसीच्या कलम ५०४, ५०६ आणि ‘विधि विरुद्ध धर्म संपरिवर्तन प्रतिषेध अध्यादेश 2020’ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने वृत्त दिले आहे.

एका हिंदू मुलीबरोबर ओवैसचे प्रेमसंबंध होते. ते मागच्यावर्षी पळून गेले. त्यावेळी ओवैसला अटक झाली होती. त्याच्यावर मुलीच्या वडिलानी अपहरणाचा आरोप केला होता. पण तो आरोप मुलीने फेटाळून लावला. मुलीच्या कुटुंबीयांनी एप्रिल महिन्यात तिचे दुसरीकडे लग्न लावून दिले. मुलीच्या या प्रकरणात वडिलांनी रविवारी एफआयआर नोंदवला. आपल्या मुलीवर ओवैस दबाव टाकून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होता. आमच्या कुटुंबाला तो सुद्धा धमकावत होता, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केली आहे.

ओवैस मुलीचे लग्न झाल्याचे समजल्यापासून मुलीच्या कुटुंबीयांना त्रास देत होता. मुलीला परत बोलवा. मुलीने धर्मांतर केल्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्यासाठी कुटुंबीयांवर दबाव टाकत असल्याचे या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तो शनिवारी मुलीच्या घरी गेला होता. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदवली असे एसएचओ दया शंकर यांनी सांगितले. लव्ह जिहाद विरोधी बनवलेल्या नव्या कायद्यातंर्गत १० वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.