एमडीएच मसालेचे दादू निवर्तले

एमडीएच या लोकप्रिय मसाला कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे आज सकाळी म्हणजे ३ डिसेंबर २०२० रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. मसाला किंग ऑफ इंडिया म्हणून मान्यता पावलेले गुलाटी दादुजी नावाने देशभर प्रसिद्ध होते. दिल्लीच्या माता चंदनदेवी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असतानाच त्याचे निधन झाल्याचे समजते.

पाकिस्तानच्या सियालकोट येथे २७ मार्च १९२३ साली महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म झाला होता. तेथेच त्यांच्या वडिलांनी व्यवसायाचा पाया घातला होता आणि एक छोटे मसाल्याचे दुकान सुरु केले होते. फाळणीनंतर मात्र ते भारतात आले आणि दिल्ली मध्ये स्थायिक झाले. येथे १९५९ मध्ये त्यांनी एमडीएच मसाले कारखाना सुरु केला. धर्मपाल गुलाटी यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले होते मात्र २०१७ मध्ये ते हायेस्ट पेड सीईओ ठरले होते. कंपनीच्या उत्पादनांच्या जाहिरातीत ते स्वतः सातत्याने झळकत असत.

राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते गुलाटी यांना पद्मविभूषण सन्मान दिला गेला होता. २०१७ मध्ये दादुजी यांच्या निधनाची अफवा पसरली होती.