३० वर्षात प्रथमच चीन कडून भारतीय तांदुळाची आयात

फोटो साभार टाईम्स ऑफ इंडिया

तांदळाची कमतरता जाणवत असल्याने चीनने ३० वर्षात प्रथमच भारतीय तांदळाची आयात सुरु केली असल्याचे समजते. भारतातून आयात केलेल्या तांदळावर चीनला मोठी सवलत मिळत असल्याचेही समजते. चीन थायलंड, व्हीएतनाम, म्यानमार, पाकिस्तान या देशातून नेहमी तांदूळ आयात करतो पण यंदा या देशांकडे पुरेसा तांदूळ साठा नाही त्यामुळे भारत हाच एक पर्याय चीन पुढे असल्याचे समजते.

भारतीय उद्योग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत हा जगातील सर्वाधिक तांदूळ निर्यातदार देश आहे तर चीन सर्वाधिक तांदूळ आयातदार देश आहे. चीन दरवर्षी ४० लाख टन तांदूळ आयात करतो. मात्र गेली काही वर्षे चीनने भारतातून तांदूळ आयात केला नव्हता. भारताच्या तांदूळ क्वालीटी बाबत चीन नेहमीच प्रश्न उपस्थित करत आला आहे. सध्या तर भारत चीन मध्ये सीमा तणाव आहे त्यामुळे राजकीय संबंध सुद्धा ताणले गेले आहेत. त्यातच भारताने चीनच्या एकूण २०० अॅप्सवर बंदी घातली आहे.

तांदूळ निर्यात असोसिएशनचे अध्यक्ष बीव्ही कृष्णा राव म्हणाले गेल्या ३० वर्षात प्रथमच चीनने भारतातून तांदूळ आयात केला आहे. डिसेंबर फेब्रुवारी पर्यंत १ लाख टन तांदूळ निर्यातीचा करार झाला असून हा तांदूळ ३०० डॉलर्स प्रती टन या दराने निर्यात होत आहे. चीन आजपर्यंत ज्या देशातून तांदूळ आयात करतो तो ३० डॉलर्स प्रती टन दराने करतो, त्या मानाने भारताचा तांदूळ महाग आहे पण चीन पुढे अन्य पर्याय सध्यातरी नाही.

करोना काळात भारतातून होणारी तांदूळ निर्यात ७० टक्के वाढली आहे आणि या वित्तीय वर्षात ७५ लाख टन तांदूळ निर्यात केला जाईल असेही समजते.