“मोदी है, तो मुमकीन है” म्हणत प्रशांत भूषण यांनी साधला सरकारच्या धोरणांवर निशाणा


नवी दिल्ली – ३५ शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी पाच सदस्यांची समिती नेमून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे मंगळवारी विज्ञान भवनात केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीची तिसरी फेरीही निष्फळ ठरली. शेतकरी कृषि विधेयक रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असून, सलग सातव्या दिवशीही त्यांचे आंदोलन कायम आहे. आता शेतकऱ्यांना या आंदोलनाच्या मुद्द्यावरुन ऑनलाइन माध्यमातूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षांपासून ते अनेक नामवंत व्यक्तींनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही ट्विटवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. बड्या उद्योजकांना एकीकडे फायदा पोहचवला जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यावर लाठीचार्ज केला जात असल्याची टीका भूषण यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.


ट्विटर प्रशांत भूषण यांनी एक फोटो शेअर केला असून ‘मोदी है तो मुमकीन है’ अशी कॅप्शन त्यांनी या फोटोला दिली आहे. अंबानी, अदानींसारख्या मोठ्या उद्योजकांसोबत या फोटोमध्ये मोदी दिसत आहे. अंबानींसमोरच्या फोटोवर टेलिकॉम, रिटेल, संरक्षण आणि शेतीसंबंधितील उद्योग अंबानींना देण्यात आल्याचे म्हटले आहे. तर विमानतळे, रेल्वे, सौरऊर्जा आणि शेतीसंदर्भातील उद्योग अदानींकडे असल्याचे म्हटले आहे. एकीकडे उद्योजकांकडे प्रमुख उद्योग असतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नशिबी वॉटर कॅनन, लाठीचार्ज आणि तुरुंगवास असल्याचे फोटोच्या शेवटच्या भागात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती दाखवताना डोळ्यावर जखम झालेल्या वयोवृद्ध शीख शेतकऱ्याचा फोटो वापरण्यात आला आहे.


अशाप्रकारे शेतकरी आंदोलनावरुन मोदींवर टीका करण्याची भूषण यांची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही वाराणसीमध्ये देव दिवाळीचा उत्सवासंदर्भातील मोदींच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. मोदींनी ‘तक् धिना धिन्! बाय बाय लाइट्स! देश जळत असताना गाण्यावर ठेका धरल्याची कॅप्शन भूषण यांनी त्या ट्विटला दिली आहे. व्हिडिओमध्ये नदीच्या किनाऱ्यावर उभे असून समोर मंदिरांना केलेली रोषणाई दिसून येत आहे. मोठ्या आवाजात भगवान शंकराचे कौतुक करणारे गाणे वाजत असल्याचे ऐकू येत असून या गाण्याच्या चालीवर मोदींनी ठेका धरल्याचे दिसून येत आहे.


कॅनडाच्या पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याचेही प्रशांत भूषण यांनी समर्थन केले आहे. लोकशाही मुल्यांसाठी जगातील प्रत्येक देशाने आवाज उठवायला हवा. कोणाला जर हा एखाद्या देशाचा अंतर्गत प्रश्न वाटत असेल, तर त्यांचा तो गैरसमज असल्याचेही भूषण यांनी म्हटले आहे.