आयसोलेट झालेल्या बहिणीला धनंजय मुंडेंचा फोन


मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपच्या नेत्या आणि त्यांची बहिण पंकजा मुंडे आजारी असल्याचे समजल्यानंतर फोनवरुन त्यांची विचारपूस केली. त्यांनी पंकजा यांना ताई तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी तुझ्यासोबत आहे, अशा शब्दात दिलासा दिला. पंकजा मुंडे सर्दी, खोकला आणि ताप असल्यामुळे आयसोलेट झाल्या आहेत.

धनंजय मुंडे म्हणाले की, मी स्वतः कोरोनाचा त्रास सहन केला आहे पंकजाताई. तुझ्या वाट्याला तो त्रास येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करुन घे. स्वतःची आणि घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे.

भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे मराठवाड्यात आल्या होत्या. त्यांना प्रचारादरम्यान सर्दी, खोकला आणि ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या. त्यांनी खबरदारी म्हणून होम आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला. पंकजा मुंडे या आजारी असल्याचे समजल्यानंतर धनंजय मुडे यांनी फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. पंकजा मुंडे यांनी कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याबाबतच्या सर्व चाचण्या करुन घ्याव्यात, स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी आणि लवकर बऱ्या व्हा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोनवरुन दिला आहे. तसंच पंकजा मुंडे यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

दरम्यान जून महिन्यात धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यामुळे कोरोनाच्या या आजारात होणाऱ्या त्रासाचा अनुभन असल्याने त्यादृष्टीने काळजी घेण्याचा सल्ला धनंजय मुंडे यांनी पकंजा मुंडे यांना दिल्याचे समजते.