सर्च इंजिन याहूच्या ‘मोस्ट सर्च सेलिब्रिटी’च्या यादीत पहिल्या स्थानावर सुशांत सिंह


मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतात सर्वाधिक सर्च केलेल्या नावांची यादी सर्च इंजिन ‘याहू’ने जाहीर केली आहे. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला याहूच्या यादीनुसार 2020 मध्ये लोकांनी सर्वाधिक सर्च केले आहे. तर सर्वात जास्त सर्च असलेली महिला सेलिब्रिटी त्याची गर्लफ्रेण्ड अभिनेत्री रिया चक्रवर्ती ठरली आहे. यावर्षी जून महिन्यात आपल्या राहत्या घरी मृतवस्थेत सापडेलला सुशांत भारतात सर्वाधिक सर्च केलेली व्यक्ती म्हणून समोर आला आहे. तर या वर्षातील पहिल्या 10 जणांमध्ये राजकीय व्यक्तींचा सर्वाधिक समावेश आहे.

या यादीत 2017 नंतर हे पहिलेच वर्ष आहे, ज्यात पंतप्रधान मोदींनी पहिले स्थान मिळालेले नाही. पंतप्रधान मोदी यावर्षी दुसऱ्या स्थानावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर रिया चक्रवर्ती आहे. तिच्यानंतर राहुल गांधी, अमित शाह, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, अमिताभ बच्चन आणि कंगना राणावत यांचा नंबर लागतो.

‘मोस्ट सर्च मेल सेलेब्रिटी’ श्रेणीमध्ये सुशांत सिंह राजपूत अव्वल स्थानावर आहे. यानतंर अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, इरफान खान आणि ऋषी कपूर आहेत. तर रिया चक्रवर्ती यंदाची ‘मोस्ट सर्च फीमेल सेलिब्रिटी’च्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2020 मधील ‘टॉप न्यूजमेकर्स’च्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहेत. तर सुशांत आणि रिया संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आणि राहुल गांधी तिसऱ्या स्थानावर आहेत.

या श्रेणीत अभिनेता सोनू सूदला विशेष स्थान मिळाले आहे. ‘हीरो ऑफ द इअर’ म्हणून त्याची निवड झाली आहे. कोरोना महामारीमध्ये परप्रांतिय मजूर तर स्थलांतरित लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक झाले होते.