कॅनडाच्या पंतप्रधानांचा भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा


नवी दिल्ली – दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी नवे कृषि विधेयक रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका घेतली आहे. कोणतीही तडजोड मागण्यांबाबत केली जाणार नाही. कोणतीही किंमत त्यासाठी मोजण्याची शेतकऱ्यांची तयारी असल्याचे सोमवारी पत्रकार परिषदेत संयुक्त किसान मोर्चाचे नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी सांगितल्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन पाचव्या दिवशी चिघळल्याचे चित्र दिसत आहे.

या कृषि विधेयकाला प्रामुख्याने पंजाब आणि हरयाणामधील शेतकऱ्यांचा विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर या शेतकरी आंदोलनाला आता थेट परदेशातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत कोणत्याही शांततापूर्ण आंदोलनाला आमचा पाठिंबा असून भारतामधील परिस्थिती चिंताजनक वाटत असल्याचे भारताचे मित्र राष्ट्र असणाऱ्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी म्हटले आहे.

आपल्या मंत्रीमंडळामधील शीख नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ट्रूडो यांनी गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी पुढे बोलताना भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला. भारतामधील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख न करणे चुकीचे ठरेल. भारतामध्ये सध्या सुरु असलेल्या या आंदोलनाची परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. तिथे असणाऱ्या शीख समुदायातील व्यक्तींच्या नातेवाईकांबद्दल कॅनडात राहणाऱ्या अनेकांना चिंता वाटत असेल आणि ते सहाजिक आहे.

पण तुम्हाला मी आठवण करुन देऊ इच्छितो की, आम्ही अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याच्या हक्काचे पाठीराखे आहोत. कोणताही प्रश्न संवादातून सुटू शकतो, यावर आमचा विश्वास असल्यामुळे आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून या विषयाबद्दलची आमची चिंता आम्ही भारतीय अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी व्यक्त केली आहे. कोरोना आणि सर्व परिस्थिती लक्षात घेता आपल्याला एकत्र राहणे गरजेचे असल्याचे ट्रूडो यांनी म्हटले आहे.