मी एक लैला अन् माझे हजारो मजनू; ओवेसींचा विरोधकांना टोला


हैदराबाद – असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षावर भाजपची बी टीम असल्याचे आरोप अनेकदा होत आले आहेत. यावर त्यांनी आरोप करणाऱ्यांना मी एक लैला असून माझे अनेक मजनू आहेत, अशा शब्दांत उत्तर दिलं आहे. ते एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत बोलत होते.

ओवेसी म्हणाले, माझा आणि माझ्या पक्षाचा सर्व राजकीय पक्ष मुद्दा बनवून त्याचा राजकीय फायदा घेण्याच्या प्रयत्नात असतात. काँग्रेसने बिहारमध्ये आमच्यावर आरोप केला की आम्ही भाजपची बी टीम असून मते कापण्याचे काम आम्ही केले. हैदराबादमध्ये काँग्रेस म्हणते ओवेसींना नाही तर आम्हाला मतदान करा. तर भाजपचे दुसरच काहीतरी चालले आहे. पण कुणाचीही मला फिकीर नाही. या आरोपांप्रमाणे मी एक लैला असून माझे अनेक मजनू आहेत. म्हणजेच आम्हाला मुद्दा बनवून विरोधक मत मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. हे सर्वकाही हैदराबादची जनता पाहते आहे की, असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष हैदराबादला प्रत्येक प्रकारे चांगले बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आता ही बाब जनताच निश्चित करेल.

रविवारी पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले होते की, हैदराबादमध्ये पूर आला त्यावेळी ओवेसी आणि टीआरएस कुठे होते. ओवेसी याचे उत्तर देताना म्हणाले, जे अमित शहा यांचे सल्लागार आहेत ते पूर्णपणे आंधळे-बहिरे आहेत. अकबरुद्दीन ओवेसींनी पूरावेळी साडेतीन कोटींची मदत केली. रोज गुडघाभर पाण्यात असदुद्दीन ओवेसी फिरत होते. याचे आमच्याजवळ फोटो आहेत. लोकांचा जीव आम्ही वाचवत होतो. मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही काम करत प्रत्येक पीडित कुटुंबाला १० हजार रुपयांची मदत मिळवून दिली.

त्याचबरोबर हैदराबादच्या जनतेशी अमित शहा खोटे बोलले आणि त्यांना एकाही रुपयाची मदत मिळवून दिली नाही. त्यांनी कर्नाटकातील पूरावेळी निधी दिला, अशीच मदत जर हैदराबादच्या पीडितांना मिळाली असती तर प्रत्येक कुटुंबाला ८० हजार रुपये मिळाले असते. पण एकही पैसा आपण दिला नाही आणि आम्हाला प्रश्न विचारता. आम्ही मदत कार्यावेळी ना हिंदू पाहिला ना मुस्लिम. प्रत्येक व्यक्तीची मदत केली, त्यावेळी भाजप झोपली होती.