शिवसेनेच्या वत्तीने करण्यात येणार अजान स्पर्धेचे आयोजन !


मुंबई – अजान पठण स्पर्धा शिवसेनेच्या वतीने आयोजित केली जाणार असून हे आयोजन शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. अजानची गोडी मुस्लीम समाजातील लहान मुलांना लागावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पांडुरंग सकपाळ यांनी एका बसीरत ऑनलाइनशी बोलताना सांगितले आहे. त्यांनी अजानला विरोध करणेही चुकीचे असल्याचे यावेळी म्हटले आहे. दरम्यान भाजपने शिवसेनेवर ही स्पर्धा आयोजित करण्यावरुन टीका केली आहे.

याबाबत माहिती देताना पांडुरंग सकपाळ यांनी म्हटले आहे की, एका धर्माची अजान भावना असून अजानमध्ये खूप गोडवा असल्यामुळे मनःशांती मिळते. बडा कब्रस्तानच्या शेजारी मी राहतो. त्यामुळे रोजच माझ्या कानावर अजान पडते. कुणाला पाच मिनिटाच्या अजानमुळे त्रास होत असेल तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे.

अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षिस दिले जाईल. मौलाना यासाठी परीक्षकाचे काम पाहतील. स्पर्धेचा सर्व खर्च शिवसेना करणार असल्याची माहिती पांडुरंग सकपाळ यांनी दिली आहे. अजानचे महाआरतीप्रमाणेच महत्त्व आहे. ते प्रेम आणि शांतीचे प्रतिक आहे. त्यावर वाद घालणे उचित वाटत नसल्याचेही ते म्हणाले आहेत.


विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी स्पर्धेच्या आयोजनावर टीका करताना पांडुरंग सकपाळ यांचे विधान आश्चर्यकारक असून सत्तेत आल्यानंतर शिवसेनेचे बदलते स्वरूप दिसत आहे. त्यांनी आणखी कहर म्हणजे बाळासाहेबांचा दाखला दिला आहे, प्रत्येक धर्म प्यारा असे बाळासाहेब बोलले असतील, परंतु त्यांची पालखी उचलणे कधी बोलले नाही, तर त्यांच्या आचार विचारावर त्यांनी टीका केलेली आहे. सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचे पांडुरंग सकपाळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे.

नमाज मातोश्रीत पढल्याचा उल्लेख हे मोठे विधान आहे. संजय राऊत यांचे पांडुरंग सकपाळ हे निकटवर्तीय आहेत आणि म्हणून आज संजय राऊत यांनी सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेच्या मूळ आचार विचाराला नेतृत्वाला तिलंजला देणारी वाटचाल येथे सुरु आहे, त्याचेच हे द्योतक आहे. नमाजासंदर्भात बाळासाहेब ठाकरे यांनी भोंगेवरुन घेतलेली भूमिका व त्यांनी केलेली कडवट टीका देशवासियांनी पाहिलेली आहे. शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाचा व देशप्रेमाचा विसर सातत्याने पडत चालल्याचे चित्र असल्याचेही ते म्हणाले आहेत.

आता मंदिरांत घंटा बडवणारा हिंदू शिवसेनेला नको तर अजान स्पर्धेचे आयोजन करणारा हिंदू हवा आहे. वेदाच्या शांतीपाठातून शिवसेना नेत्यांना मनःशांती मिळत नाही, त्याचबरोबर ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंगातून, भजन किर्तनातून मनःशांती मिळत नाही तर अजान ऐकण्यातून मिळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की हिंदुत्व हे काय धोतर आहे का सोडून द्यायला ? पण उद्धवजी धोतर तरी कमरेभोवती घट्ट आवळलेले असते पण तुमचे हिंदुत्व हे खांद्यावरच्या उपरण्यासारखे होते, तुम्ही एक वर्षापूर्वीच जे काढून बाजूला ठेऊन दिले. एवढे तकलादू हिंदुत्व शिवसेनेचे होते हे आता महाराष्ट्रासमोर सिद्ध झाल्याची टीका भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या आचार्य तुषार भोसलेंनी केली आहे.