लष्कराची प्रशिक्षित कुत्री करू शकणार करोनाचे निदान

फोटो साभार इंडिया टुडे

कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता प्रचंड मोठी असते. याचा वापर करून अनेक प्रकारचे रोग निदान करणे शक्य होईल का यावर जगभर संशोधन केले जात आहे. दरम्यान मेरठ येथील कॅन्टोन्मेंट मध्ये लष्करी श्वानांना दीड महिन्याचे प्रशिक्षण दिले असून ही प्रशिक्षित कुत्री रुग्णाच्या सँपलचा गंध घेऊन रुग्ण करोना बाधित आहे काय हे ओळखण्यात यशस्वी ठरली आहेत. विशेष म्हणजे सँपलचा वास दिल्यावर अगदी काही क्षणांत या कुत्र्यांनी हे सँपल करोना बाधित आहे असे संकेत दिल्याचे समजते.

रिमाउंट वेटरनरी कोर मध्ये तीन जातीच्या कुत्र्यांना हे प्रशिक्षण दिले गेले. त्याच्या चाचण्या दिल्लीत सुरु आहेत. लेब्रोडोर, कॉकर स्पेनीयल व दक्षिण भारतीय चीप्पीपराई या जातीच्या तीन कुत्रांना हे प्रशिक्षण दिले गेले. रुग्णाच्या सँपल मध्ये करोना विषाणू आहे काय यासाठी हे प्रशिक्षण होते. कुत्र्यांनी दिलेले संकेत नंतर मेडिकल रिपोर्टशी ताडून पाहिले गेले तेव्हा ते ९९ टक्के बरोबर होते असे आढळले.

कोविड बाधा झालेल्या रुग्णाच्या शरीरातून विशेष प्रकारचे रसायन स्रवते आणि त्याचा वास कुत्रे बरोबर घेऊ शकते. यापूर्वी मलेरियाचे रुग्ण याच पद्धतीने कुत्री शोधून काढू शकतात यावर संशोधन झाले आहे. प्रत्येक रोगजंतूचा काही विशिष्ठ गंध असतो. माणसाच्या गंध घेण्याच्या क्षमतेपेक्षा कुत्र्यांमध्ये ही क्षमता १ हजार पटीने अधिक असते. त्यामुळे कुत्र्यांना विशिष्ट गंध घेण्यासाठी प्रशिक्षित करता येते. अमली पदार्थ, स्फोटके कुत्री नुसत्या वासावरून शोधून काढू शकतात आणि त्यांचा त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केलाही जातो.

अमेरिकेत पेनसिल्वानिया येथे कुत्र्यांना करोना गंध घेता येईल का यावर संशोधन झाले आहे तसेच ब्रिटन मध्येही असे संशोधन सुरु आहे. भारतात या संदर्भात प्रशिक्षित केलेल्या कुत्र्यांनी चांगले रिझल्ट दिले आहेत. मात्र त्यासाठी आणखी अधिक संख्येने चांचण्या होणे आवश्यक आहे. एकदा या चाचण्या यशस्वी झाल्या की विमानतळ, आंतरराष्ट्रीय सीमा, राज्यातील सीमा, स्टेडियम अश्या ठिकाणी ही प्रशिक्षित कुत्री उपयोगात आणणे शक्य असल्याचे समजते.