एप्रिल ते मे महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्याचा विचार : वर्षा गायकवाड


मुंबई : शिक्षण क्षेत्रासमोर कोरोना काळात अनेक मोठी आव्हाने आली. याच दरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, तंत्रज्ञानाचा शैक्षणिक क्षेत्रात विकास होणे गरजेचे असल्यामुळे महाराष्ट्रात तंत्रज्ञानाचे एक फोरम भविष्यात निर्माण केले पाहिजे, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसेच साधारणतः एप्रिल किंवा मे महिन्या दरम्यान दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्याचा विचार सुरु असल्याचेही त्यांनी एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझे व्हिजन’ या कार्यक्रमात सांगितले.

शिक्षण व्यवस्था कोरोनामुळे कशा सुरु करायच्या हा प्रश्न केवळ काही राज्यांचा नाहीतर, संपूर्ण जगासमोर होता. त्यानंतर शिक्षण विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु झाला. ऑनलाईन, ऑफलाईन, त्याचबरोबर शिक्षकांनी प्रत्येक जिल्ह्यांत जाऊन विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही लोकांकडे मोबाईल नाही ही बाब लक्षात आल्यानंतर टेलिव्हिजन आणि काही दिवसांतच गूगलचा पर्याय निवडण्यात आला. त्याचबरोबर मुलांपर्यंत अभ्यासक्रम पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअॅपचाही मार्ग वापरण्यात आला. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती शिक्षण खात्याने कोरोना काळात केलेल्या कामांबद्दल बोलताना दिली.

पुढे बोलताना वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने नियमावली तयार करण्यात आली. त्यामध्ये निर्जंतुकीकरण, स्वच्छता आणि इतर सोयीसुविधांसह शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्टही करण्यात आल्या. यानुसार, जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये 9 हजार 127 शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तर 3 लाख विद्यार्थ्यांनी त्या शाळांमध्ये उपस्थिती लावली आहे.

साधारणतः फेब्रुवारी आणि मार्चमध्ये दहावी बारावीच्या परीक्षा या घेतल्या जातात. पण काही ठिकाणी अद्यापही शाळा सुरु आहेत, त्याचबरोबर सध्या काही ठिकाणी शाळा सुरु करणे शक्य नाही. आपण यासंदर्भात शिक्षण तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत आहोत. यासंदर्भात माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळासोबत चर्चा सुरु आहेत. असा प्रयत्न सुरु आहे की, मे किंवा एप्रिलमध्ये सर्वसाधारणपणे परीक्षा घेतल्या जाव्यात. कारण कोकणात जूनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असतो, तर विदर्भात मे महिन्यात प्रखर उन्हाळा असतो. त्यामुळे येत्या काळात याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण राहू नये म्हणून आधीच 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

ऑनलाईन पद्धतीने दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासमोर प्रस्ताव ठेवला होता. पण दहावीचे, बारावीचे विषय हे खूप असतात. तसेच वेगवेगळ्या भाषाही असतात. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणे हे त्यांच्या दृष्टीने काहीसे कठीण असल्यामुळे या दृष्टीकोनातून आधी काही बाबी तपासून घ्याव्या लागतील, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्या अनुषंगाने प्रयत्न सुरु असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.