करायचा तेवढा आवाज करा, सरकार पडले तर बघू काय करायचे – सुप्रिया सुळे


पुणे – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडणार असे जे लोक सारखे म्हणतात, ते ऐकताना मला फार गंमत वाटते. कारण मोकळी भांडी खूप आवाज करतात आणि भरलेली भांडी कधीच आवाज करत नसल्याचा टोला विरोधकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. जेवढा आवाज करायचा तेवढा करा, सरकार पडले तर बघू काय करायचे. आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी येथे कोणी आलेले नाही. आम्ही आज सत्तेत आहोत कधीतरी त्यांची सत्ता येईल. पण ती वेळ लवकर येणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे इंदापूरात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा प्रचार करताना बोलत होत्या.

जे लोक सारखे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडणार असे म्हणतात, ते ऐकताना मला फार गंमत वाटते. कारण मोकळी भांडी खूप आवाज करतात त्यामुळे जेवढा आवाज करायचा तेवढा करा, सरकार पडले तर बघू काय करायचे. हे सरकार स्थिर आणि टिकणारे सरकार असल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी नरेंद्र मोदी येणार आहेत. ते यावेळी लसीच्या प्रगतीसंबंधी आढावा घेणार आहेत. आपल्या सरकारला एक वर्ष होणार आणि देशाचे प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यातील ठिकाणी काम होत आहे हे पाहण्यासाठी येणार याच्यापेक्षा काय मोठे यश आपल्या सरकारचे असेल?, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. वेगळ्या विचाराचे देशाचे प्रधानमंत्री असले तरी त्यांना आपले पुणे हवेहवेसे वाटत असल्याचा टोला त्यांनी लगावला.