लता मंगेशकर यांनी सांगितले त्यांच्यावर झालेल्या विष प्रयोगामागील सत्य


देशाच्या गानकोकिळा अर्थात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर विषप्रयोग झाला असल्याची माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. लता मंगेशकर हे नाव १९६३ साली सर्वश्रुत झाले होते. त्याकाळी त्यांना गाण्यासाठी दिवसाचे तास कमी पडत होते. त्याच दरम्यान त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. पण हा विषप्रयोग कुणी केला? हे मला कळले होते पण माझ्याकडे त्यावेळी पुरावा नसल्याचे आता लता मंगेशकर यांनी म्हटले आहे. त्यांनी हा खुलासा बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

खूप जुनी ही गोष्ट आहे. माझ्यावर त्यावेळी विषप्रयोग करण्यात आल्यामुळे मी खूप आजारी झाले होते. मी जवळपास तीन महिने अंथरुणाला खिळून होते. त्यावेळी अशाही चर्चा रंगल्या होत्या की लता मंगेशकर पुन्हा गाऊ शकणार नाहीत. पण त्या केवळ अफवा होत्या. मला एकाही डॉक्टरने हे सांगितले नव्हते की तुम्हाला पुन्हा गाता येणार नाही. डॉ. आर.पी. कपूर यांनी मला बरे केले. या आजारातून त्यांनी मला बरे केले. माझे गाणेही तीन महिने बंद होते. मला भयंकर अशक्तपणा आला होता. त्यावेळी मी अशक्त झाले होते की मला उठून चालताही येत नव्हते. त्याचबरोबर मी भविष्यात चालू शकेन की नाही असाही प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला होता.