विरोधकांना दिवसातून 5 वेळा चंद्रकांत पाटील नावाची गोळी घेतल्याशिवाय झोपच लागत नाही


पंढरपूर : सांगोला येथे नुकताच पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला खडसवत धमकीची भाषा शिवसेनेने वापरू नये. मी सुद्धा चळवळीतील कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर विरोधकांना दिवसातून पाच वेळा चंद्रकांत पाटील नावाची गोळी घेतल्याशिवाय झोपच लागत नसल्याचा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटीलांनी सत्ताधारी शिवसेना आणि विरोधकांवर या मेळाव्यादरम्यान टीकास्त्र डागले आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष होत असले तरी हे सरकार सर्वच ठिकाणी अपयशी ठरल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भाजप आणि महाविकास आघाडीसाठी पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. त्याचपार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीकांचा वर्षाव होताना दिसत आहे. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत.

दरम्यान, आज शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांची मेळाव्या आधी चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. ही भेट देशमुख यांच्या सोलापुरातील सांगोला येथील निवासस्थानी झाली. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी ही भेट घेतली असल्याची माहिती देण्यात आली आहे.