बीबीसीच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत उत्तराखंडमधील 13 वर्षांच्या रिद्धीमा पांडेचा समावेश


नवी दिल्ली – उत्तराखंडमधील रिद्धीमा पांडे या 13 वर्षांच्या मुलीचा नुकत्याच जाहीर झालेल्या बीबीसीच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. रिद्धीमाला जगातील 100 प्रभावशाली आणि प्रेरणादायक महिलांच्या यादीमध्ये स्थान मिळाले आहे. या प्रतिष्ठीत यादीत वयाच्या 13 व्या वर्षी स्थान मिळविणारी ती सर्वात कमी वयाची व्यक्ती आहे. तिने पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या कामाची दखल घेत या यादीत तिला स्थान देण्यात आले आहे.

आई-वडीलांसोबत रिद्धीमा हरिद्वारमध्ये राहते. तिचे वडील दिनेश पांडे वन्यजीव कार्यकर्ते असून आई विनिता राज्याच्या वन विभागात कार्यरत आहे. सध्या रिद्धीमा नववीत शिकत आहे. केंद्र सरकारविरोधात ‘पर्यावरण कायदा’ योग्य प्रकारे अंमलात आणण्यात अपयशी ठरल्याबद्दल याचिका दाखल केल्यानंतर रिद्धीमा वयाच्या नवव्या वर्षी चर्चेत आली होती.

तिने राष्ट्रीय हरित लवादाकडे 2017 मध्ये याचिका दाखल केली होती. तिने या याचिकेच्या माध्यमातून कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जनाला मर्यादा घालण्यासाठी ‘कार्बन बजेट’ तयार करून राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन योजना तयार करण्याची मागणी केली होती. 2019 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेत सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या अर्जेंटिना, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी आणि तुर्कस्थान या पाच देशांविरूद्ध याचिका दाखल करणार्‍या स्वीडिश कार्यकर्त्या ग्रेटा थुनबर्गसह 16 बाल याचिकाकर्त्यांमध्ये रिद्धीमाचा समावेश होता.

केदारनाथला 2013 मध्ये महापूरामुळे झालेल्या दुर्घटनेचा आपल्यावर परिणाम झाल्यानंतर पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी काम करण्याचा आपण निर्णय घेतल्याचे रिद्धीमाने सांगितले. निसर्गावर मानवाकडून करण्यात येणाऱ्या आक्रमणामुळे होणाऱ्या दुर्घटना आणि त्यामुळे होणारी जीवितहानी हा अक्षम्य गुन्हा असल्याचे तिने सांगितले. अशा दुर्घटना आपल्या चुका सुधारून टाळण्याची गरज आहे. निसर्गावर आक्रमण न करता पर्यावरणपूरक आणि पर्यावरण रक्षणाचा विचार करून आपण जीवनशैलीत बदल केले, तर नैसर्गिक दुर्घटना कमी होतील, असेही तिने सांगितले. निसर्गावर मानवाने आक्रमण केलेल्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती कोसळल्याचे दिसून आल्याचेही ती म्हणाली.

देशात पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आपल्याला फिरायचे असल्याचे तिने सांगितले. हे वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे इतिहासातील संस्मरणीय वर्ष ठरणार आहे. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा महत्त्वाचा धडा कोरोना महामारीमुळे आपल्याला मिळाला आहे. आपल्याला याचे आगामी काळात भान ठेवावे लागणार आहे. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी आपण देशभरातील शाळा- महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याचेही रिद्धीमाने सांगितले.