उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीच्या प्रोमोवर निलेश राणेंची टीका


मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारला वर्षपूर्तीच्या निमित्ताने सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘अभिनंदन मुलाखत’ घेतली असून नुकताच या मुलाखतीचा प्रोमो संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे रिलीज करत ‘उद्या धमाका’ असे त्याला कॅप्शन दिले आहे.

संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचे त्याचबरोबर राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. उद्धव ठाकरेंना संजय राऊत या प्रोमोमध्ये काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. मुख्यमंत्री या प्रश्नांना कसे सामोरे जातात, काय उत्तरे देतात त्याची झलक दिसत आहे. पण उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीच्या प्रोमोवरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.


यासंदर्भात निलेश राणे यांनी एक ट्विट केले असून ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ज्या मुलाखतीतून आणि ज्या व्यक्तींकडून महाराष्ट्राला काही मिळत नाही, अशा लोकांना बघायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही. चंगू मंगू च्या फालतू गप्पा, असं म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.