देशभरात ऑगस्टपर्यंत पंधरापैकी एक जण कोरोनाबाधित


नवी दिल्ली: देशातील दुसर्‍या सीरो सर्वोक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला असून या अहवालानुसार १० वर्षापेक्षा जास्त वयाच्या ६. ६ टक्के लोकांना, अर्थात १५ पैकी एका व्यक्तीला करोना संसर्ग झाला आहे. यापैकी १. १ टक्के प्रौढ व्यक्तींमध्ये करोनाला प्रतिबंध करणारी प्रतिपिंड तयार झाल्याचे आढळून आले आहे. सर्वेक्षणानुसार ऑगस्टपर्यंत ७. ४३ कोटी लोकांना ऑगस्टपर्यंत करोनाची लागण झाली आहे.

मे आणि ऑगस्ट दरम्यान, प्रौढांमध्ये संसर्ग १० पट वाढला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. हे २१ राज्यांमधील ७० जिल्ह्यातील ७०० गावे व प्रभागांमध्ये करण्यात आले. याच ठिकाणी पहिले सीरो सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणात २९ हजार ८२ नमुने तपासण्यात आले.

राजधाननी दिल्लीतील सर्वात मोठ्या करोना सर्वेक्षणाचे निष्कर्षही जाहीर करण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये २० ते २४ नोव्हेंबरदरम्यान घरोघरी केलेल्या सर्वेक्षणानुसार एकूण १३ हजार ५१६ जणांमध्ये संसर्गाची लक्षणे आढळून आली आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या ८ हजार ४१३ जणांनाही शोधण्यात आले. यापैकी, लक्षणे असलेले ११ हजार ७९० जण आणि त्यांच्या संपर्कातील ६ हजार ५४६ जणांची चाचणी घेण्यात आली आहे. एकूण १ हजार १७८ जणांना करोना संसर्ग झालेला आढळला. अर्थात आतापर्यंतचा संसर्ग दर ६. ४२ टक्के एवढा आहे.