कोरोनामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन


नवी दिल्ली : सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले असून ते 71 वर्षांचे होते. त्यांना एक महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, अखेर मृत्यूशी त्यांचा सुरु असलेला लढा अपयशी ठरला असून आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विट करत सांगितले की, आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी वडील अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. त्यांना एका महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांच्या अनेक अवयवांनी एकाच वेळी काम करणे बंद केल्यानंतर त्यांच्या शरीराचे अनेक अवयव निकामी होत गेल्यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. तुम्हा सर्वांना मी आवाहन करतो की, कोरोनाच्या गाइडलाइन्सचे पालन करा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी अहमद पटेल यांच्या निधनानंतर ट्विट करत म्हटले आहे की, आपल्यातून अहमद पटेल निघून गेले. एक अभिन्न मित्र विश्वसनीय साथी निघून गेला आहे. 1977 पासून आम्ही दोघेही एकत्र होतो. लोकसभेत ते पोहोचले आणि मी विधानसभेत. आम्हा सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ते प्रत्येक राजकीय आजाराचे औषध होते. मृदुभाषी, व्यवहार कुशल आणि सदैव हसतमुख राहणे हिच त्यांची ओळख होती.