गुजरातपेक्षा जास्त वेगाने महाराष्ट्राची प्रगती मी मुख्यमंत्री असताना झाली – देवेंद्र फडणवीस


पुणे – गुजरातपेक्षा जास्त वेगाने मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती झाल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे. गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आमच्या सरकारच्या काळात आली. आम्ही महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणल्याचेही ते म्हणाले. आम्ही टीका केली की महाराष्ट्रद्रोही ठरत नाही. जनतेला सारे काही समजते. शिवसेना म्हणजे महाराष्ट्र असा समज त्यांनी करून घेऊ नये, असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

राज्यातील या निष्क्रिय सरकारविरूद्ध जनतेत मोठा रोष आहे. कोणतीही मदत शेतकर्‍यांना नाही. वीजबिलांचा घोळ त्यामुळे मोठा असंतोष आहे आणि या निवडणुकीतून तो व्यक्त होईल. या सरकारने आमच्या एकाही आंदोलनाची दखल घेतली नाही, त्याचबरोबर आमच्या एकाही पत्राला उत्तर नाही, त्यांनी कधी कोणती बैठक घेत नाही. या सरकारला जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही. जनतेचे दु:ख अशावेळी मांडले गेले पाहिजे आणि तेच आम्ही आंदोलनांच्या माध्यमातून मांडत असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

किमान पंतप्रधानांकडे तक्रार करण्यापुरती तरी त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली, याचा आम्हाला आनंद असल्याचे म्हणत फडणवीसांनी यावेळी टोला देखील लगावला. सरकारकडून मराठा आरक्षणाच्या बाबतीत केवळ वेळकाढूपणा चालू असल्यामुळे केवळ मराठाच नाही, तर सार्‍याच समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान केले जात आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रारंभीपासून सरकारने लक्षच दिले नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

आम्ही सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत आज आहोत. त्याचबरोबर सरकार पडण्याची वाट पाहत आम्ही बसलेलो नाही. पण, हेही तितकेच खरे आहे की, अशी अनैसर्गिक सरकारे फार काळ चालत नाहीत. ज्यादिवशी हे सरकार पडेल, त्यादिवशी एक सक्षम सरकार आम्ही राज्याला देऊ, असे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे.