कियारा-आदित्यच्या ‘इंदू की जवानी’चा ट्रेलर रिलीज


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी हिची मुख्य भूमिका असलेला ‘इंदू की जवानी’ हा चित्रपट येणार आहे. सध्या सोशल मीडियावर अबीर सेनगुप्ता दिग्दर्शित या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. एक प्रेमकथा ‘इंदू की जवानी’ या चित्रपटातून उलगडली जाणार आहे. एका भारतीय स्त्रीची भूमिका यात कियाराने साकारली आहे. तर अभिनेता आदित्य सील हा पाकिस्तानी नागरिकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये इंदू ही भूमिका कियारा साकारत असून समर या भूमिकेत आदित्य पाहायला मिळणार आहे. एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून इंदू समरला भेटते आणि त्यांच्यात चांगली मैत्री होती. पण समर एक पाकिस्तानी नागरिक असल्याचे याच काळात इंदूच्या लक्षात येते आणि ती त्याला दहशतवादी समजते. यामध्येच ती त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करते तर समर तिच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत तो दहशतवादी नसल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे या सगळ्या प्रवास अनेक मजेशीर किस्से घडताना दिसतात.

सध्या सोशल मीडियावर हा ट्रेलर लोकप्रिय ठरत असून ९ लाखांपेक्षा जास्त ट्रेलरला व्ह्युज मिळाले आहेत. येत्या ११ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे सध्या सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन सुरु आहे.