कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रासह चार राज्यांकडून मागवला अहवाल


नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव सण उत्सवाच्या काळात वाढून दुसरी लाट येण्याची शक्यता केंद्रीय समितीने वर्तवली होती. आता देशात तशीच परिस्थिती निर्माण होताना दिसत असून, कोरोनाचा पुन्हा उद्रेक अनेक राज्यांमध्ये झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्रासह चार राज्यांना सद्य परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात कोरोना रुग्णांवरील उपचार व मृत्यू मृतदेहांच्या हाताळणीसंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली खंठपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने यावेळी दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. चार राज्यांमध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली असून, राज्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.