या राज्यांनंतर राजस्थानमध्येही रात्रीच्या वेळेस संचारबंदी; विनामास्क दिसल्यास 500 रुपये दंड


नवी दिल्ली – काही काळा पूरता शांत झालेल्या कोरोनाने पुन्हा एकदा आपले डोकेवर काढले असून देशभरात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुजरात आणि मध्य प्रदेशामध्ये संचारबंदी लागू केल्यानंतर आता राजस्थान सरकारनेही त्यादृष्टीने खबरदारीचे उपाय घेण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानमधील 8 शहरांमध्ये रात्रीच्या वेळेस संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह विनामास्क दिसल्यास आकारण्यात येणार दंड वाढवून 500 रुपये करण्यात आला आहे. तर राजधानी जयपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आला आहे.

शनिवारी रात्री मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. कोरोनाचा संसर्ग सर्वात जास्त असलेल्या 8 जिल्ह्यांच्या (जयपूर, जोधपुर, कोटा, बीटेकर, उदयपुर, अजमेर, अलवर आणि भीलवाड़ा) शहरी भागात बाजारपेठा, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स आणि अन्य व्यावसायिक संस्था सात वाजेपर्यंतच सुरु राहतील त्याचबरोबर या 8 जिल्ह्यांच्या शहरी भागात रात्री 8 ते सकाळी 6 या वेळेत नाईट कर्फ्यू राहील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोना प्रादुर्भाव होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण राज्यात विवाह सोहळ्यासह राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी कार्यक्रमांमध्ये सामील होणाऱ्या लोकांची संख्या 100 करण्यात आल्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.

तत्पूर्वी मध्य प्रदेशातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता, नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. शनिवारीपासून रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत नाईट कर्फ्यू भोपाळ, इंदौर, विदिशा, रतलाम आणि ग्वाल्हेर या पाच जिल्ह्यांत लागू करण्यात आला आहे. राज्यात शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.

त्याचबरोबर नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय गुजरात सरकारने देखील घेतला आहे. हा कर्फ्यू अहमदाबाद शहरात शुक्रवार (20 नोव्हेंबर) रात्री 9 ते सोमवारी (23 नोव्हेंबर) सकाळी 6 वाजेपर्यंत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गुजरात सरकारने नव्याने लॉकडाउन करण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या महाराष्ट्रात काही शहरांत मुंबई, ठाण्यात 31 डिसेंबर पर्यंत शाळा बंद राहणार आहे. याबाबतचे आदेश पालिकेने जारी केले आहेत.