शाळांसंदर्भात सरकार काही ठोस भूमिका घेणार की नाही? आशिष शेलार यांचा सवाल


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्यामुळे मुंबई व ठाण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यावरून पालक-विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, याच मुद्यावरून ठाकरे सरकारवर भाजपने निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?, असे ट्विट करत भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

प्रशासनाने मुंबई व ठाण्यातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे शाळा सुरू उघडण्याच्या निर्णयावरून गोंधळ निर्माण झाला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यावर सविस्तर माहिती देत यात स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले होते. आशिष शेलार यांनी याच मुद्यावर बोट ठेवत काही प्रश्न सरकारला विचारले आहेत.


शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाचीच..पण शासन म्हणून काही करणार आहात की नाही. शिक्षक, संस्थाचालक, पालक संघटना, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन सरकार काही ठोस भूमिका घेणार की नाही? पालक, विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत. भयभीत असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.


परीक्षा घेण्यावरुन संभ्रम. परीक्षा घेतल्या त्यात पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप. अॅडमिशवरुन गोंधळ. फी वाढीबाबत हतबलता. अभ्यासक्रमाबाबत ही प्रश्नचिन्ह. शाळा सुरू करण्यात तर सावळागोंधळ. महाराष्ट्रात सरकार आहे कि छळछावणी?, असा सवाल शेलार यांनी सरकारला विचारला आहे.