संजय दत्तच्या आगामी ‘तोरबाज’चा ट्रेलर रिलीज


कॅन्सरसारख्या रोगावर मात केल्यानंतर बॉलीवूडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्त लवकरच आपल्या भेटीस येणार असून नुकताच त्याच्या आगामी तोरबाज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नाही, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. संजय दत्तचा तोरबाज हा असा दुसरा चित्रपट आहे, जो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. यापूर्वी त्यांचा आलिया भट्टसोबतचा सडक-2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो प्रेक्षकांना आवडला नव्हता. मात्र, यावेळी संजय दत्तचा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

11 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूपच जबरदस्त असून चित्रपटाचे बहुतांश शूटिंग अफगाणिस्तानात झाले आहे. या चित्रपटात संजयसोबत नर्गिस फखरी दिसणार आहे. संजय दत्त या चित्रपटात एका क्रिकेट कोचची भूमिका साकारत आहे. यात संजय दत्त अफगाणिस्तानमधील शिबिरात मुलांना क्रिकेट शिकविताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये संजय दत्तने या मुलांना बंदूक आणि दहशतीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे.

तोरबाज अशा माणसाची गोष्ट आहे, जो आपल्या वैयक्तिक त्रासातून मुक्त होऊन स्वत: काहीतरी करण्याचा दृढनिश्चय करतो. आत्मघाती बॉम्बर बनलेल्या शरणार्थी शिबिराच्या मुलांसाठी क्रिकेटमध्ये प्रशिक्षण देण्याचा त्यांचा निर्धार आहे. क्रिकेट कोच म्हणजेच संजय दत्त या विळख्यातून या मुलांची सुटका करु शकणार की नाही हे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मलिक यांनी केले असून यात संजय दत्त यांच्यासह नर्गिस फाखरी आणि राहुल देव यांच्या मुख्य भूमिका आहेत.