कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत


नवी दिल्ली: देशातील काही राज्यांमधील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली असून देशातील बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या काळात मोठी गर्दी दिसून आली होती. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्यावेळी कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केल्यानंतर देशातील काही राज्यांमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत वाढ पाहायला मिळत आहे. हरयाणा, मणिपूर, गुजरात आणि राजस्थानात त्या पार्श्वभूमीवर केंद्राने आरोग्य पथके पाठवली आहेत. आता केंद्राकडून आणखी काही राज्यांमध्येही वैद्यकीय पथके पाठवण्याचा विचार सुरू आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव थंडीच्या दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता असल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण वाढवा, असा सल्ला याआधीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिला आहे. जास्त व्यक्तींच्या संपर्कात कोरोनाचे रुग्ण येण्याआधी आरोग्य यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचेल, यादृष्टीने पावले उचला. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी अभियाने राबवा, अशा सूचना आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना दिल्या आहेत. वेळेत कोरोना रुग्ण आढळून येत नसल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निरीक्षण मंत्रालयाने नोंदवले.

कोरोनाबाधितांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांच्या दौरा केंद्र सरकारने पाठवलेली पथके करतील. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणाऱ्या आवश्यक योजना आखून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम या पथकांकडून केले जाईल. राज्याच्या आरोग्य यंत्रणेसोबत काम करून कोरोनाविरुद्धच्या लढाईचे व्यवस्थापन मजबूत करण्याची जबाबदारी देखील या पथकांवर असेल.

त्यातच राजधानी दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढली आहे. दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा परिणाम एनसीआर (नॅशनल कॅपिटल रिजन), हरयाणा आणि राजस्थानातही दिसू लागला आहे. या भागांमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

केंद्रासाठी महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यातील परिस्थिती चिंताजनक ठरत आहे. काल महाराष्ट्रात कोरोनाचे ५ हजार ५३५ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांचा आकडा १७ लाख ६३ हजार ५५ वर पोहोचला. तर राज्यात काल १५४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ४६ हजार ३५६ एवढी झाली. तर दिल्लीत काल कोरोनाचे ७ हजार ५४६ कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे बाधितांचा आकडा ५.१ लाखाच्या पुढे गेला. कोरोनामुळे राजधानीत काल मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ९८ एवढी आहे.