महाराष्ट्रातील जनतेने केरळ आणि दिल्लीचा बोध घ्यावा – राजेश टोपे


रत्नागिरी – सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना राजधानी दिल्ली करत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतही मागील दोन दिवसांत चिंताजनक वाढ झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर जनतेला खबरदारीचा इशारा दिला आहे. खबरदारी घेण्यास राज्य सरकारनेसुरूवात केली आहे. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आली, तर ती सगळ्यांना महागात पडेल. राज्यात लाट येऊ नये, असे वाटते, पण मनात भीती असल्याचे म्हणत राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे.

राजेश टोपे यांनी रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना चिंता व्यक्त केली. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिल्लीत वाढताना पाहायला मिळत आहे. खबरदारी घेण्यास महाराष्ट्र सरकारने सुरुवात केली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे राज्यातील जनतेने केरळ आणि दिल्लीचा बोध घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी नागरिकांना केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव केरळ आणि दिल्लीमध्ये वाढत आहे. मास्कचा वापर टाळणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यामुळे दिल्ली आणि केरळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे शाळा सुरु होत असताना मुलांची सुरक्षा महत्वाची असल्यामुळे शिक्षकांनी शाळांच्या निर्जंतुकीकरणासाठी जे शक्य असेल ते त्यांनी करावे. नाहीतर एखाद्याला कंत्राट देऊन शाळांचे निर्जंतुकीकरण करावे, अशी विनंती टोपे यांनी केली आहे.

राज्य सरकारने सध्या कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे पार पाडण्याची परवानगी दिली आहे. पण लग्नासाठी उपस्थिती संख्या वाढवण्याचे संकेतही आता टोपे यांनी दिले आहेत. तसेच कुणीही कोरोनाला गृहित धरू नये. सर्वांनी काळजी घ्यावी, स्वंयशिस्त पाळली पाहिजे, तरच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करणे शक्य होईल, असेही राजेश टोपे म्हणाले.