मुंबई वगळता राज्यातील शाळा व महाविद्यालये २३ नोव्हेंबरपासून होणार सुरु


मुंबई – मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून पुन्हा वाढू लागला असून कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. या संदर्भातील आदेश महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिले असून आता मुंबईतील शाळा थेट नवीन वर्षीच उघडल्या जाणार आहेत. तरी २३ नोव्हेंबरपासून राज्यातील अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार असताना मात्र असा निर्णय मुंबईत घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याच निर्णयावर महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

डिसेंबरपर्यंत मुंबई महापालिका हद्दीतील शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयाबाबत एबीपी माझाशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, मी स्थानिक प्रशासनावरच आपापल्या हद्दीतील शाळा सुरु करण्याचा निर्णय हा सोडला होता. सकाळी माझी या विषयावर मुंबई महापालिका आयुक्तांसोबत चर्चा झाली. त्यानंतर मुंबई हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अजूनही इतर संबंधितांशी बैठका आणि चर्चा माझ्या सुरुच आहेत. ज्या ठिकाणी पूर्ण तयारी झाली आहे, त्या ठिकाणी शाळा २३ नोव्हेंबरला सुरु कराव्यात. ज्या ठिकाणी अद्याप तयारी झालेली नाही त्याठिकाणी स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा.

राज्यात नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईसह राज्यातील कोरोनाचे संकट अद्याप कमी झालेले नाही. जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी रस्त्यांवर गर्दीही वाढताना दिसत असल्यामुळे कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढला असून दिवसागणिक रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.