२३ नोव्हेंबरला भाजपचे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन


मुंबई – राज्यातील राजकारण आता वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरुन चांगलेच तापले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीमध्ये सामान्यांना वाढीव वीज बिलातून थेट दिलासा देणारा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आता विरोधी पक्ष भाजपने या पार्श्वभूमीवर अधिक आक्रमक भूमिका घेतली असून सोमवारी (२३ नोव्हेंबर) भाजपच्या वतीने राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकट काळात सर्व सामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतानाच वाढीव वीज बिलांमुळे अतोनात हाल झाले आहेत. त्यात माजलेल्या वीज बिल माफ करणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यांचा हाच माज उतरवण्यासाठी जनतेच्या हितार्थ वीजबिल सवलतीसाठी भाजपने वीजबिल होळी आंदोलन पुकारल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदर कोरोनाकाळातील वीजबिलांमध्ये सवलत देण्याचे जाहीर करून घूमजाव करणे, हा लाखो ग्राहकांचा विश्वासघात असल्याचा असा आरोप राज्य सरकारवर केलेला आहे.


ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लोकांमधील असंतोषाची दखल घेत वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. पण राज्य सरकारवर या सवलतीपोटी किमान दोन हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याने आणि राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने हा निधी देण्याबाबत वित्त विभागाने आखडता हात घेतल्यामुळे ही सवलत देता येणार नसल्याची कबुली दोनच दिवसांपूर्वी ऊर्जामंत्र्यांना द्यावी लागली होती.

वीज बिलात सवलत देण्यास राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला भाग पाडण्यासाठी सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी भाजपातर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.


राज्यातील नागरिकांना लॉकडाउनच्या काळात भरमसाठ वीजबिले आली. याबाबत महाविकास आघाडी सरकारने सवलत देण्याचे जाहीर केले होते. पण या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच आता स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे. तर, महावितरण सक्तीने वीज बिल वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. जनतेचा महाविकास आघाडी सरकारने विश्वासघात केला आहे. सत्तेच्या धुंदीतून या सरकारला जागे करण्यासाठी भाजप राज्यात सर्वत्र वीज बिलांच्या होळीचे आंदोलन करणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.