वीज बिलांवरुन भाजप नेत्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांवर कोसळलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगले तापले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये सामान्यांना वाढीव वीज बिलातून थेट दिलासा देणारा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. राज्य सरकारची चिंता महावितरणच्या ६७ हजार कोटींच्या थकबाकीने वाढविली असून, नव्याने मोहीम वसुलीसाठी राबविण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. याबाबत दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पण या बैठकीमध्ये थेट कोणतीच भूमिका ठाकरे सरकारने न घेतल्यामुळे भाजप नेते निलेश राणे आणि किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. आता ठाकरे सरकारलाच झटका देण्याची वेळ आली असून सर्वसामान्यांना सरकारी तिजोरीतील एक दमडीचाही फायदा न पोहचू देणारे देशातील हे एकमेव राज्य सरकार असल्याची टीका निलेश राणेंनी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांवर वाढीव बिलांची वीज कोसळली. त्यामुळे लोकांमध्ये असलेल्या असंतोषाची दखल घेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. पण राज्य सरकारवर या सवलतीपोटी किमान दोन हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याने आणि राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने हा निधी देण्याबाबत वित्त विभागाने आखडता हात घेतल्यामुळे ही सवलत देता येणार नसल्याची कबुली दोनच दिवसांपूर्वी ऊर्जामंत्र्यांना द्यावी लागली होती.

त्यानंतर आता राज्यातील राजकारण या वीज बिलांवरुन चांगलच तापले आहे. कोरोनाकाळातील वीजबिलांमध्ये सवलत देण्याचे जाहीर करून घूमजाव करणे, हा लाखो ग्राहकांचा विश्वासघात आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर विरोधकांच्या टीकेचे धनी ठरलेल्या ऊर्जामंत्र्यांनी भाजपवर प्रतिहल्ला चढवत, फडणवीस सरकारच्या काळात किमान सरासरी कार्यक्षमता न दाखविल्याने महावितरणची थकबाकी त्या पाच वर्षांत तिपटीने वाढल्याचा आरोप केला.


निलेश राणेंनीही सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष या वादामध्ये उडी घेतली आहे. ट्विटरवरुन ठाकरे सरकारवर राणेंनी निशाणा साधला आहे. लोकसत्ताची ‘झटका कायम! ठाकरे सरकारकडून वाढीव वीज बिलांमध्ये दिलासा नाहीच‘ ही बातमी शेअर करत राणेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारला झटका देण्याची वेळ आली आहे. देशातले एकमेव राज्य सरकार असेल ज्यांनी लोकांसाठी सरकारी तिजोरीतील एक दमडीचा फायदा थेट लोकांपर्यंत पोचवला नाही. सगळं जर-तर, किंतु-परंतु आणि सर्वात शेवटी कोमट पाणी प्या आणि स्वतःची काळजी घ्या, असे म्हणत राणेंनी ठाकरे सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.


तर गुरुवारी ठाकरे सरकारवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही निशाणा साधला. राज्य सरकारने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या लोगोमध्ये बदल करुन त्यात वीज बिलाचा फोटो टाकत, माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी, असा सोमय्यांनी टोला लगावला आहे.