हरियाना आरोग्य मंत्री अनिल विज करोना लस चाचणीत सहभागी

फोटो साभार केरळ कौमुदी

हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज हे करोना लस चाचणीत स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले असून त्यांना शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास अंबाला तेथील रुग्णालयात लस देण्यात आल्याचे समजते. विज स्वेच्छेने या परीक्षणात सहभागी झाले आहेत. हैद्राबादची फार्मा कंपनी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या रोहतक, हैद्राबाद आणि गोवा येथे सुरु झाल्या असून अनिल विज यांनी याच कार्यक्रमात स्वतः लस टोचून घेतली आहे.

तिसऱ्या टप्प्यात २००-२०० स्वयंसेवकांना शुक्रवारी पाहिला डोस दिला जात आहे. २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाणार आहे आणि त्यानंतर ४८ दिवसांनी लस घेतलेल्या लोकांच्या शरीरात प्रतीपिंड किती प्रमाणात तयार झाले याची चाचणी घेतली जाणार आहे. हे परिणाम योग्य असतील तर देशभरात निश्चित केलेल्या २१ विभागात २५८०० स्वयंसेवकांना लस दिली जाणार आहे. पीआयजीचे कुलपती डॉ. ओ.पी. कालग म्हणाले या लसीचा धोका कमी आहे. आत्ता पर्यंत जितक्या लोकांना चाचणी म्हणून लस दिली गेली त्यातील दोघांना थोडा ताप व लस दिली तेथे थोड्या वेदना झाल्या आहेत. पण त्यांना करोना झालेला नाही.

या लसीचे काही साईड इफेक्ट होतात का याची पाहणी सातत्याने सुरु आहे. तसेच लसीचा परिणाम किती दिवस राहतो हेही तपासले जाणार असून पुढील वर्षभर स्वयंसेवकाच्या शरीरातील अँटीबॉडी तपासण्या केल्या जाणार आहेत. फेब्रुवारी नंतर ही लस बाजारात येईल असे सांगितले जात आहे.