माजी मंत्री एकनाथ खडसे यांना करोना

भाजपला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आश्रयाला गेलेले माजी मंत्री एकनाथ उर्फ नाथाभाऊ खडसे यांना करोनाचा विळखा पडला आहे. स्वतः खडसे त्यांनी त्यांच्या ट्विटर अकौंट वर त्यांची कोविड १९ टेस्ट पोझिटीव्ह आल्याची पोस्ट टाकली आहे. शिवाय गेल्या सात दिवसात त्यांच्या सहवासात आलेल्या सर्व लोकांनी करोना टेस्ट करून घ्यावी असेही म्हटले आहे.

खडसे यांच्यावर जळगाव येथील सारा स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उपचार केले गेले आहेत पण खडसे पुढील उपचारांसाठी मुंबईला येत आहेत असेही समजते. खडसे यांनी ट्विटरवर ही माहिती दिली असून तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत, लवकरच यातून बरा होईन असेही म्हटले आहे. खडसे यांची कन्या रोहिणी आणि नात यांनाही करोना संसर्ग झाला होता.

यापूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनीत तटकरे, रामदास आठवले, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री अशोक चव्हाण, असलम शेख, धनंजय मुंडे, उदय सावंत, जितेंद्र आव्हाड, संजय बनसोड, अब्दुल सत्तार या नेत्यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. दरम्यान गेल्या २४ तासात राज्यात ५०११ नवीन रुग्ण सापडले आहेत आणि १०० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण १७,५७,५२० जणांना करोना लागण झाली असून त्यातील ८०२२१ जणांवर उपचार सुरु आहेत. ४६२०२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. उर्वरित रुग्ण बरे झाले आहेत.