महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमाचे होणार थेट प्रक्षेपण


मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी दि. ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून तसेच ‘ऑनलाईन’ माध्यमांतून लाईव्ह प्रक्षेपण करण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चैत्यभूमीवर न येता घरातूनच महामानवाला अभिवादन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महापरिनिर्वाणदिनी महामानवाला वंदन करण्यासाठी लाखो भीमसैनिक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते चैत्यभूमी येथे येत असतात. मात्र, यावर्षी या कार्यक्रमावर करोनाच्या महासाथीचे सावट असल्याने गर्दी टाळण्याच्या दृष्टीने महापालिकेने या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्षेपणासाठी सर्व सुविधा महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आवश्यकता भासल्यास राज्य शासनही त्यासाठी सहकार्य करणार आहे.

थेट प्रक्षेपणाच्या सुविधेमुळे नागरिकांना घरीच हा कार्यक्रम पाहता येणार आहे. महापरिनिर्वाणदिनाच्या दिवशी अनुयायांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाईव्ह सोहळ्याच्या माध्यमातून अभिवादन करावे, चैत्यभूमीवर प्रत्यक्ष येणे व गर्दी करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.