वीज बिलांवर दिलासा देण्यावरून मनसे नेत्याचा सरकारला इशारा


मुंबई – राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोरोना काळातील वाढीव वीज देयकांतून ग्राहकांना दिलासा देण्याच्या मुद्दय़ावरुन घूमजाव केले. वीज कंपन्या चुकीचे देयक देणार आणि सरकार त्याचे पैसे भरणार, हे कसे चालेल, असा सवाल करत राऊत यांची सवलतीची मागणी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतील अर्थ विभागाने फेटाळल्यामुळे वीज सवलत मिळण्याची शक्यता मावळल्याने ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. दरम्यान, यानंतर ऊर्जामंत्र्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून टीकाही करण्यात आली होती. पण आता मनसेने संघर्ष करावाच लागेल, असे म्हणत राज्य सरकारला इशारा दिला आहे.


वीज बिलासंदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण लाथो के भूत बातों से नही मानते, अशा आशयाचे ट्विट करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला इशारा दिला आहे.