संसदेचे हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन एकत्र होणार?

दिल्ली मध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप दिवसेनदिवस अधिक उग्र होट असल्याने संसदेचे हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन एकत्र घेण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे समजते. अर्थात त्या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत घोषणा केली गेलेली नाही.

आजवरच्या परंपरेनुसार नोव्हेंबर मध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होते आणि डिसेंबर मध्ये संपते. अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होते आणि १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडला जातो. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर करोनाची छाया होती. यंदाचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबर रोजी सुरु झाले पण करोना मुळे ते आठ दिवसात संपविणे भाग पडले होते. करोना बचावासाठी सर्व प्रकारच्या उपाय योजना केल्या गेल्या होत्या. त्यात संसद प्रत्येक बैठकीनंतर सॅनीटाईज करणे, सोशल डीस्टन्सिंग, मास्क वापर, संसदेत येणाऱ्या प्रत्येकाची करोना चाचणी असे उपाय योजूनही अनेकांना करोनाची लागण झाली होती. या परिस्थितीत सुद्धा २१ विधेयके संसदेत मंजूर केली गेली होती.

मिळालेल्या माहितीनुसार एका वर्षात तीन अधिवेशने घेणे हा परंपरेचा भाग आहे मात्र तसा कायदा नाही. त्यामुळे दोन अधिवेशने एकत्रित थोड्या अधिक कालावधी साठी घेतल्याने कायद्याचे उल्लंघन होण्याचा प्रश्न येत नाही. करोनाची लस अजून दृष्टीक्षेपात आलेली नाही. त्यामुळे करोना संसर्गाचा धोका कायम आहे. यामुळे दोन अधिवेशने एकत्र घेण्याबाबत चर्चा आणि विचार विनिमय सुरु असल्याचे समजते.