केदारनाथमधील बर्फवृष्टीमुळे अकडून पडले योगी आदित्यनाथ, त्रिवेंद्र सिंह रावत


देहरादुन – केदारनाथ मंदिराचे द्वार बंद होण्याआधीच तिथे बर्फवृष्टी झाल्यामुळे केदारनाथ मंदिरात दर्शनाठी पोहचलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अडकून पडण्याची वेळ आली आहे. ८.३० वाजता केदारनाथचे द्वार बंद होताच दोन्ही मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरने बद्रिनाथ गाठायचे होते. पण बर्फवृष्टी झाल्यामुळे हेलिकॉप्टरचे उड्डाण शक्य नसल्यामुळे या दोघांपुढे बर्फवृष्टी थांबण्याची वाट पाहण्याखेरीज काहीही मार्ग उरला नाही.

बर्फाची दुलई केदारनाथ मंदिर आणि परिसरावर पसरल्याचे चित्र आहे. थंडीचा कडाकाही या भागात वाढला आहे. मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी गंगोत्री धाममध्येही झाली आहे. गंगोत्री धामचे द्वार बंद होताच वातावरणात बदल झाला आणि बर्फवृष्टी सुरु झाली. थंडीचा कडाका भारतातील पर्वतरांगा असलेल्या भागात वाढल्याचे दिसून येत आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान या राज्यांमध्ये झालेल्या पावसामुळे हवा जास्त थंड झाली आहे. बर्फवृष्टीमुळे उंचसखल भागात राहणाऱ्या स्थानिकांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. येत्या काही दिवसांमध्ये तापमान आणखी कमी होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.