एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पहिल्यांदाच खान्देशात जाणार शरद पवार!


जळगाव : उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जाणार आहेत. भाजपला रामराम ठोकत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात असल्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांच्या या दौऱ्याला मोठे महत्त्व असल्याचे समजले जात आहे. 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी शरद पवार उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार येथील शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जाणार आहेत.

एकनाथ खडसे यांनी जवळपास महिन्याभरापूर्वी भाजपमध्ये अन्याय झाल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसे यांच्या प्रवेशानंतर भाजपचा बाले किल्ला असलेल्या उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता 20 आणि 21 तारखेला शरद पवार धुळे आणि नंदुरबार येथे शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

राजकीयदृष्ट्या त्यांच्या या दौऱ्याला महत्त्वपूर्ण मानले जात आहे. कारण खडसेंचे समर्थक केवळ जळगाव जिल्हाच नव्हे तर धुळे आणि नंदुरबारमध्येही मोठ्या प्रमाणावर आहेत. भाजपमधील अनेक खडसे समर्थक शरद पवार यांच्या या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्यात कोण कोण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार याकडे लक्ष लागले आहे. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला बळकटी करण्याच्या दृष्टीने शरद पवार यांचा हा दौरा महत्त्वाचा असल्याने या दौऱ्यात काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.