नितीश कुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची, तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ


पाटणा – आज सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची नितीश कुमार यांनी शपथ घेतली. त्याचबरोबर ते सलग चौथ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. राज्यपाल फागू चौहान यांनी पाटण्यातील राजभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात त्यांना शपथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपचे बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला उपस्थित होते.

नितीशकुमार यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची भाजप नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी शपथ घेतली. बिहारच्या राजकारणात दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच जेडीयू नेते विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी आणि मेवालाल चौधरी यांनी तर हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रमुख जितनराम मांझी यांचे पुत्र संतोष कुमार सुमन आणि विकासशील इन्सान पार्टीचे मुकेश साहनी यांनी बिहारच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

नितीश कुमार यांनी काल एक महत्वाचा खुलासा केला होता. ते म्हणाले होते, मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा नव्हती, मला भाजपमधून कोणीतरी मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत होते. पण मी मुख्यमंत्री भाजपने केलेल्या आग्रखातर होत आहे. नितीश कुमार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते.