शासकीय नियमांना केराची टोपली दाखवत काँग्रेस आमदाराची विनामास्क मंदिराच्या गाभाऱ्यात पूजा


पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मागील आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे आजपासून अखेर उघडण्यात आली आहेत. त्याकरिता नियम आणि अटींसह परवानगी देण्यात आली आहे. पण, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या आमदाराने शासकीय नियमांना केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे. पुण्यातील पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांनी विनामास्क मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पूजा केली आहे.

जेजुरीचा खंडोबा गड गेली आठ महिन्यांपासून जास्त काळ कोरोनाच्या परिस्थितीमुळे बंद होता. राज्यातील मंदिरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर भाविकांसाठी दर्शनासाठी उघडण्यात आली आहेत. पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सपत्नीक आज पहाटे साडेपाच वाजता खंडेरायाची महापूजा, अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

आज जेजुरीगड देवाची भूपाळी, सनईचे मधुर सूर आणि महाआरतीच्या मंगलमय वातावरणात जागा झाला. पण, जगताप यांनी सहपत्नी मुख्य गाभाऱ्यात पूजा केली तेव्हा त्यांनी मास्क घातला नव्हता. त्याचबरोबर पूजा करवून घेताना पुजाऱ्यांनी देखील मास्क घातला नव्हता. मंदिरे उघडी असताना मंदिरात मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले होते. पण, नियमांची जगताप आणि मंदिर प्रशासनाकडून पायमल्ली केल्याचे समोर आले आहे.