भाऊबीजेच्या निमित्ताने सर्व भाऊरायांना अमृता फडणवीस यांचे एकच मागणे


मुंबई – भाऊबीजेच्या निमित्ताने एक गाणे पोस्ट करुन सगळ्या भाऊरायांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक मागणे केले आहे. हे गाणे त्यांनी प्रत्येक भाऊरायाला समर्पित केले आहे.

ट्विटरच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांनी आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे.. तिला शिकू द्या. जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या. समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या. दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत तिला जगू द्या, असे म्हणत आपले नवे गाणे ट्विट केले आहे.


आपले नवे गाणे अमृता फडणवीस यांनी स्त्रियांना समर्पित केले आहे. त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना स्त्री शक्तीचे महत्व पटवून दिले आहे. अमृता फडणवीस यांनी या गाण्याच्या व्हिडीओत त्यांचा आणि त्यांच्या मुलीचाही फोटो वापरला आहे. तसेच कशाप्रकारे पुरुषांच्या खांद्याला खांदा स्त्रिया या लावत आहेत ते दाखवून दिले आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या नव्या गाण्यातून स्त्री भ्रूण हत्या होतात, स्त्रियांना नाकारले जाते, त्यांच्या हक्कांपासून त्यांना वंचित ठेवले जाते, त्यांच्यावर अत्याचार होतात हे सगळे टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी त्यांचे नवे गाणे समाज जागृतीच्या दृष्टीने समोर आणले आहे.

ट्विटर आणि फेसबुकवर अमृता फडणवीस यांनी हे गाणे पोस्ट करताच त्यांच्या या गाण्यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. हे गाणं आवडल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे. पण महाराष्ट्रातील सगळ्या भाऊरायांना दिवाळीच्या निमित्ताने स्त्री ला जगू द्या, समाज भक्कम करायचा असेल तर तिला शिकू द्या, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.