मंदिर उघडण्याचा निर्णय अहंकारापोटी रखडवला होता : प्रवीण दरेकर


मुंबईः राज्यभरातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे उघडण्याचा मोठा निर्णय आज ठाकरे सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जनतेला मोठी भेट दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवरुन ठाकरे सरकारवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी निशाणा साधला आहे. मंदिरे उघडण्याचा निर्णय इगोपोटी रखडवला, मंदिरे उघडणे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

मंदिर उघडण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारला प्रवीण दरेकरांनी खडे बोल सुनावले. हा निर्णय या सरकारने आधीच घ्यायला हवा होता. पण केवळ आंदोलकांना, पुजाऱ्यांना वारकऱ्यांना भाजप सपोर्ट करते, मग अहंकारातून त्यांना मदत करायची नाही, हा निर्णय इगोपोटी रखडवला होता, अशी टीकाही प्रवीण दरेकरांनी केली आहे.

उशिरा का होईना सरकारला शहाणपण सुचले, सर्वांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल, असेही प्रवीण दरेकरांनी अधोरेखित केले आहे. बार आणि रेस्टॉरंट सुरू होतात, मग हा निर्णय का रोखला होता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आमची मागणी हीच होती. गरीब माणूस पांडुरंग किंवा परमेश्वराचरणी समाधान आणि शांती शोधत असतो. शिवाय जे व्यवसाय यावर अवलंबून असतात, त्यांचीही उपासमार होणार नाही, अशी आमची मागणी असल्याचेही प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केले आहे.