जाणून घ्या लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त; कसे कराल लक्ष्मीपूजन?


गणेशोत्सव आणि नवरात्रीनंतर आपल्या देशातील सर्वात मोठा सण येतो तो दिवाळीचा सण. वसुबारसपासून दिवाळीची सुरूवात होते. त्यानंतर धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा (पाडवा), भाऊबीज असे सण दिवाळीमध्ये साजरे केले जातात. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन यावेळी एकाच दिवशी आले आहे. तर एकाच दिवशी पाडवा आणि भाऊबीज देखील आले आहे. आज दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी सणाचा पहिलाच दिवस. दिवाळी पहाटची सुरुवात सर्वत्र दिव्यांची आरास, घरापुढे रांगोळी, दरवाज्याला तोरण लावून होते.

दिवाळीचा सण आणि लक्ष्मी पूजन यंदा एकत्रितपणे साजरा केला जाणार असून देवी लक्ष्मी, कुबेर आणि गणेशाची लक्ष्मी पूजनावेळी पूजा केली जाते. तसेच घरात सुखशांती, समृद्धी कायम रहावी यासाठी प्रार्थनाही केली जाते. लक्ष्मी पूजन या दिवशी संध्याकाळी केली जाते. लक्ष्मीला फराळाचा आणि लाह्या-बत्तास्यांचा नैवेद्य लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दाखवला जातो.

रंगीबेरंगी रांगोळ्या आजच्या दिवशी घराबाहेर काढल्या जातात. दिव्यांची त्यावर आरास केली जाते. सारा परिसर कंदील, विद्युत रोषणाई यामुळे प्रकाशमय होतो. फटाक्यांची आतिषबाजी होते. मिठाई, फराळ यांची मेजवानी असते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. पण, यंदा कोरोनाच्या संकटामुळे सर्वच सण साजरे करण्यावर काही निर्बंध आले आहेत.

दर्श अमावस्या, महालक्ष्मी कुबेरपूजन आश्विन कृष्णपक्ष, शनिवार दि. 14 नोव्हेंबर 2020 दुपारी 2.18 पर्यंत चतुर्दशीनंतर अमावस्या आहे. शुभ मुहूर्त : संध्याकाळी 5.28 ते 7.30 पर्यंत.

लक्ष्मीपूजनाची तयारी करतानाप प्रथमत: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडुची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जुन लावावे. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वाराजवळ शिंपडावे. दिवाळीतील लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा शेंदूराचा वापर करून स्वस्तिक काढावे, असे सांगितले जाते. गणपती बाप्पाचे स्वस्तिक चिन्ह हे प्रतीक मानले जाते. घरात सकारात्मक ऊर्जेचा स्वस्तिक चिन्हामुळे संचार होतो. सुख, समृद्धीत वृद्धी होते, असे सांगितले जाते.

ज्याठिकाणी लक्ष्मीपूजन करावयाचे आहे, त्या पूजेच्या ठिकाणी नवग्रह यंत्र ठेवा. त्यावर सोन्याचे किंवा चांदीच नाणे ठेवा. हे उपलब्ध नसल्यास आपण काही नाणी किंवा पैसे देखील ठेऊ शकता. त्यानंतर गणपती आणि लक्ष्मी मातेच्या दोन्ही मूर्तींना स्नान घालून स्वच्छ धुवून-पुसून विराजमान कराव्यात. तसेच त्या फुलांनी देखील सजवाव्यात. त्यानंतर मूर्तीच्या उजव्या बाजूला तुपाचा किंवा तेलाचा पंचमुखी दिवा लावून पूजा संपन्न करावी.