बळीराजाची दिवाळी या महाविकास आघाडी सरकारने अंधारातच ठेवली – देवेंद्र फडणवीस


मुंबई – शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरून राज्यातील महाविकासआघाडी सरकावर निशाणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साधला आहे. आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर, पोलिसांनी जेलभरो आंदोलन करणारे वडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे. दिवाळीच्या दिवशी या सर्वांना कारागृहातच रहावे लागत असल्यावरून देखील फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यात दीपोत्सवाचे पर्व साजरे होत असताना मदतीविना आपला बळीराजा संकटात आहे. या सरकारने त्याची दिवाळी अंधारातच ठेवल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

याबाबात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, बळीराजा संकटात असताना त्याची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी सरकारकडे मागण्या करण्यात आल्या, सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पण सरकार दाद द्यायलाच तयार नाही. बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहताना भाजपने अनेक ठिकाणी बेसन-भाकर आंदोलन केले.


तसेच, दीपोत्सवाचे पर्व साजरे होत असताना आपला बळीराजा मात्र मदतीविना संकटात आहे. त्याची दिवाळी या सरकारने अंधारातच ठेवली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, संत्र्याचे प्रचंड नुकसान झाले. बोंडअळीने कपाशी संपविली. मराठवाडा, विदर्भ आणि इतरही सर्व भागात हीच अवस्था! पण मदत द्यायला सरकार तयार नसल्याचे देखील फडणवीस आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहेत.


त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.