महाराष्ट्रात या महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची आरोग्य विभागाच्या संचालकांनी वर्तवली शक्यता


मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील सगळ्या डॉक्टरांना, सरकारी रुग्णालयांना, जिल्हा रुग्णालयांना, आरोग्य अधिकाऱ्यांना डॉ. अर्चना पाटील यांनी पत्र लिहिले आहे.या पत्रात त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार राहा, असे म्हटले आहे. त्याचबरोबर चाचण्या कोणत्याही परिस्थितीत थांबवता येणार नसल्याचेही डॉ. अर्चना पाटील यांनी हे वक्तव्य टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

ताप, फ्लू यांसारख्या लक्षणांसाठी वेळेत सर्वे केला गेला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत रोज होणाऱ्या चाचण्या थांबवता कामा नयेत. शहरी आणि ग्रामीण भागातील फिव्हर क्लिनिक्स यांनी रोजचे अहवाल दररोज सादर करावेत. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे यावर लक्ष ठेवण्यास आरोग्य विभागाला मदत होईल, असे डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.

कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचे सध्याच्या घडीला प्रमाण शहरी आणि ग्रामीण भागात कमी झाले आहे. पण वेळेत कोविड आणि नॉन कोविड रुग्णांना उपचार मिळणे गरजेचे असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील कोविड सेंटर्सने सज्ज रहावे, असेही डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.